सध्या अलीकडे माणुसकीचे नाते जपताना फारच कमी लोक पहायला मिळतात. प्रत्येक जण फक्त आपला स्वार्थच पाहत असतात. सध्या अनेक मुले आपल्या आईवडिलांचा सांभाळ करीत नसल्याने वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आई वडिलांवर येते.आपल्याला सांभाळत नाही, जेवणखान, कपडालत्ता देत नाही, औषधोपचार सुध्दा बघत नाही, तसेच वारंवार धमकी देत असतो, अशी फिर्याद प्रत्यक्ष वडिलांनी आपल्या मुलाविरुद्ध विटा पोलिसांत दिली आहे.
याप्रकरणी चंद्रकांत हंबीरराव जगताप (रा. भाग्यनगर, ता. खानापूर) याच्यावर ज्येष्ठ नागरिक व कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप यांनी म्हटले आहे की, आपले वय 85 असून मुलगा चंद्रकांत जगताप हा सन 2019 पासून माझा सांभाळ करीत नाही. जेवणखान, कपडालत्ता, औषधोपचार सुध्दा बघत नाही. वारंवार धमकी देत असतो. तसेच, पालनपोषणाची जबाबदारी घेतलेली नाही.
विशेष म्हणजे चंद्रकांत जगताप याच्या वडिलांनी प्रांताधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्याय प्राधिकरणाचे विटा उपविभागाचे अध्यक्ष विक्रमसिंह बांदल यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक पोटगीनुसार अर्ज दाखल केला होता. त्यावर वडिलांचा सांभाळ करणे मुलाचे कर्तव्य आहे, असा निकाल प्रांताधिकार्यांनी देऊनसुद्धा त्यांनी दिलेल्या निर्णयाचाही मुलगा चंद्रकांत याने अवमान केलेला आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे. यावरून विटा पोलिस ठाण्यामध्ये मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
