आ. जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून इस्लामपूर व आष्टा उपजिल्हा रुग्णालयात १० डायलिसिस मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र त्या मशीन चालविण्यासाठी टेक्निकल स्टाफ नव्हता. मात्र आता तो लवकरच उपलब्ध होणार असल्याने या दोन्ही ठिकाण लवकरच रुग्णांसाठी मोफत डायलिसीस सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी दिली. संग्राम जाधव म्हणाले, मशिन उपल्ब्ध करुन दिल्यानंतर देखील मशिन वापरासाठी आवश्यक टेक्निकल स्टाफ उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची हयगय दिसून आली.
याबाबत आ. जयंतराव पाटील यांनी राज्यसरकार व आरोग्य मंत्री यांच्याकडे अनेक वेळा टेक्निकल स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ती मागणी लवकरच पूर्ण होईल व आष्टा ग्रामीण व इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आ. जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून डायलिसिस मशीन उपलब्ध झालेल्या असून त्याचे श्रेय दुसऱ्या कोणीतरी घेण्याची आवश्यकता नाही. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख, शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, इस्लामपूर शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, विक्रम पाटील, विनायक यादव आदी उपस्थित होते.
