Bhogi 2025: न खाई भोगी तो सदा रोगी ! संक्रांत अन् भोगीचं नातं काय?

महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे भोगी. हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’हे वाक्य तुम्ही ऐकलेच असेल.भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पीकं पिकावे म्हणून प्रार्थना करतात, अशी मान्यता आहे. ती पीक वर्षानुवर्षे पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भोगीची भाजी घरा घरामध्ये शिजवली जाते. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात.

भोगीच्या दिवसात गुलाबी थंडीला सुरुवात होते. भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकंच खास आहे. वटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरबरा, तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं. तर काही भागात भाकरी लोण्यासह खातात.

विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खमंग खिचडीही या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते.जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असे म्हणतात. भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच “भोगी देणे” म्हणतात. भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो.

या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रीत पाण्याने अभ्यंगस्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशाप्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.