भुयारी गटारी कामासंदर्भात सांगोला तालुक्यातील नागरिकांमधून नाराजीचा सूर

सध्या अनेक भागात भुयारी गटारी करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे खुदाई करण्यात येत आहे. परंतु हे काम करीत असताना नागरिकांना याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. सांगोला शहरातील भुयारी गटारीचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. शहराची लोकसंख्या आणि त्या प्रमाणात वापरात येणारे पाणी याचा विचार करता, सध्या भुयारी गटारी योजनेसाठी वापरण्यात येत असलेल्या पाईपमधून पाणी बसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सांगोला शहर व उपनगरात पावसाळ्यात छोट्या मोठ्या गटारी तुडुंब भरून वाहतात यातून पाणी ओसंडून अनेकदा रस्त्यावर आल्याचेही सांगोलकरांनी अनुभवले आहे. मग या भुयारी गटारी योजनेच्या पाईप मधून हे पाणी वाहून जाणार का असा प्रश्न अनेक जण उपस्थित करताना दिसून येत आहेत. भुयारी गटारी योजनेसाठी चेंबरचे काम केले जात आहे त्या ठिकाणी बांधकामावर पाणी मारले जात नाही. सिमेंटचा वापर कमी केला जात असल्याची ही तक्रारी आहेत.

यासह ज्या दिवशी बांधकाम केले जाते त्याच दिवशी ते बुजवून घेऊन पुढे काम सुरू ठेवले जात आहे. यामुळे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्याही नागरिक तक्रारी करीत आहेत. सदर योजनेच्या काम लेबर व जेसीबी चालक यांच्या विश्वासावर सुरू असून, कामाची लाईन लेव्हल, खोदाई मधील उंची याबाबत तपासणीसाठी इंजिनियर उपस्थित राहत नाहीत. परिणामी सदरचे काम रामभरोसे सुरू असल्याबाबत नागरिकांमधून आरोप प्रत्यारोप होत आहेत.

भुयारी गटारी योजनेच्या कामासाठी खुदकामात अनेकांच्या पाण्याच्या लाईन जुन्या गटारीची पाईप यासारख्या अनेक गोष्टीचे नुकसान होत आहे. परंतु संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करून आपले काम पूर्ण करून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु याचा नाहक त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. सदरची योजना पूर्णत्वाला गेल्यानंतर पुन्हा शहराच्या नशिबी उघड्या गटारी येऊ नये म्हणजे झालं याबाबत ही नागरिकांमधून चर्चेचा विषय ठरत आहे.

तसेच खुदाईमुळे धुळीच्या प्रमाणात देखील भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र आहेच. रस्त्यावरील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे सांगोलाकरांचा श्वास कोंडला जात असतानाच, आजारांना निमंत्रण देणारी धूळ वातावरणात भरून राहिल्याने धोका प्रचंड वाढला आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर किमान वाहने जाणे इतपत रस्ता सुरू ठेवणे गरजेचे असताना, संबंधित प्रशासकीय अधिकारी कार्यालयामध्ये बसून नियोजन करतात परंतु याचा नाहक त्रास नागरिकांना होत असल्याची संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

धुळीमुळे होत असलेल्या त्रासामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वाढला आहे. संबंधित ठेकेदार यांच्याकडून खोदाई केलेल्या कामावरील जमा होणारी माती व कचरा बाजूला सारून आपले काम उरकून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे परिणामी याचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर होत असून, पालिका प्रशासनाने धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणी मारून घ्यावे आणि सांगोलकरांना धूळ आणि प्रदूषणापासून मुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.