सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांना (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तब्बल २३ हजार मतांनी चितपट करत विजय मिळविला आहे.डॉ. बाबासाहेब यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पराभवाचे उठ्ठे काढले आहे. तांत्रिक कारणामुळे तीन फेऱ्यांची आकडेवारी आणि अंतिम निकाला निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेला नाही.
सांगोला विधानभा मतदारसंघात विसाव्या फेरीअखेर डॉ. बाबासाहेब देशमुख यांना एक लाख एक हजार ३६५ मते मिळाली आहेत, शिवसेनेचे शहाजी पाटील यांना ८३ हजार ४९७, शिवसेना उबाठाचे दीपक साळुंखे यांना ४६ हजार ७९९ मते मिळाली आहेत. पुढील तीन फेऱ्यांची मतमोजणी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नाही.सोलापूर जिल्ह्यात सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना एकाकी निवडणूक लढवावी लागली हेाती. एकही मोठा नेता प्रचाराला आलेला नसतानाही दोन भावांनी मिळून सांगोल्याची निवडणूक एकहाती जिंकली आहेडॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत यांनी निवडणुकीत एकत्र येत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय सांगोल्यातील निवडणुकीतील टर्निंग पॉईंट ठरला आहे. त्याचा परिणाम निकालातून दिसून आलेला आहे.
मागील २०१९ च्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे हे एकत्र होते, त्यामुळे मागील निवडणुकीत शहाजी पाटील यांचा 768 मतांनी विजय झाला होता. आता मात्र शहाजीबापू आणि दीपक साळुंखे यांच्या मतांमध्ये विभागाणी झाली. त्याचा फायदा डॉ. बाबासाहेब देशमुख यांना झाल्याचे दिसून येत आहे.