सांगोला शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्याची नागरिकांमधून मागणी

सध्या अनेक भागात विकास कामांचा धडाका सुरु आहे. अनेक भागातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, पार्किंग व्यवस्था याकडे प्रशासन लक्ष देत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सांगोला तालुक्यात अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु असल्याचे सर्वांच्याच कानी आहे. पण हे अवैध्य धंदे बंद होणार कधी असा सूर शहरवासियांमधून उमटत आहे. सांगोला शहर आणि तालुक्यात छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना, लुटमार, वाहतुकीचा प्रश्न, वाळू वाहतूक, मोबाईल चोरी, अनुचित प्रकार, हाणामारी सारख्या घटना घडत आहेत. यामध्ये सण उत्सव निमित्ताने नेहमीच चोरीच्या घटना घडत असताना चोरी रोखण्यासाठी तत्कालीन कोल्हापुर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सन २०१७-१८ मध्ये लोकार्पण झालेले सीसीटीव्ही कॅमेरे सांगोला पोलीसांनी पुढाकार घेऊन दुरुस्त करून घ्यावेत.

कॅमेरे सुरू झाल्यास चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे पोलीस प्रशासनाला शहरामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास लावण्यामध्ये मदत मिळणार असल्याने पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन शहरातील नादुरुस्त असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून घ्यावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. सांगोला शहरात कायदा व सुव्यस्था अबाधित राहवी, चोरीला व गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीवर नियंत्रण रहावे व शहरातील शांतता अबाधित रहावी या हेतुने रोटरी क्लब, सांगोला पोलिस स्टेशन, व्यापारी व लोकसहभागाच्या माध्यमातुन लाखो रुपये खर्चुन बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये बिघाड झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सांगोला पोलिस स्टेशन कडुन शहरातील रोटरी क्लब व नागरीकांच्या सहकार्यातुन प्रमुख चौक व वर्दळीच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. तर सांगोला बसस्थानकाच्या उजवीकडील बाजुस व वासुद चौकाच्या समोर पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. शहरात मुख्य चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामुळे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यासाठी यापूर्वी चांगली मदत मिळाली आहे.

तसेच कॅमे-यांच्या निगराणीमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये पोलिसांना यश देखील मिळाले आहे. परिणामी शहरातील गुन्हेगारीला वचक बसणार असे चित्र निर्माण झाले होते आणि नागरीकांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. तसेच अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्याबळावर शहरांमध्ये पोलिसांना नियंत्रण ठेवणे सहजपणे शक्य होते. लाखो रुपये खर्च करुन बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांतील बिघाडामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था व शांतता पुन्हा ऐरणीवर येण्याच्या मार्गावर आहे. मागील ७ वर्षापासून कॅमे-यांची करडी नजर बंद झाल्याने शहरात प्रत्येक चौकाचौकात बोळा- बोळात अवैद्य धंदे खुलेआम सुरू आहेत.

वाहतुक व्यवस्था विस्कळीत होत आहे, भुरट्या चो-या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, अवैद्य वाळु वाहतुक यासारख्या अनेक घटना खुलेआम घडत असल्याने शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीला पुन्हा वाव मिळत आहे. याकडे पोलिसांचे सरळसरळ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्यास गेल्यानंतर आमच्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले जात असल्याने याबाबत सांगोला पोलिसांनी व तालुक्यातील दानशूर व्यक्तीने पुढाकार घेऊन शहरातील बंद पडलेले काही कॅमेरे तातडीने दुरुस्त करून घ्यावेत. व शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.


सांगोला शहरात महत्त्वाच्या आठ चौकांमध्ये ३२ कॅमेरा सुरू करण्यात आले होते. याबाबत सर्वच कॅमेरे पूर्ववत सुरू करण्यात यावेत. यासह पोलीस पाटील व सरपंच यांच्या पुढाकाराने गावामध्ये सायरण बसवण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते. यापैकी अनेक गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यातील ही कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत. पोलिसांनी याकडे ही लक्ष घालून सदरचे कॅमेरे सुरू करावेत जेणेकरून सध्या वाढत्या चोरीच्या प्रमाणावर व इतर गुन्ह्याला देखील आळा बसणार आहे. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.