अनेक भागात द्राक्ष बागायतदार लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. बरेच शेतकरी हे द्राक्ष शेतीकडे वळलेले आहेत. खानापूर घाटमाथ्यांवर देखील द्राक्ष बागांचे प्रमाण जास्त प्रमाणात पहायला मिळत आहेत. सध्या द्राक्ष हांगाम सुरु झालेला आहे. खानापूर घाटमाथ्यांवरील द्राक्ष हंगाम सुरू असून सुलतानगादे परिसरातील द्राक्षांना ४ किलोला ३६० ते ३८० रुपये दर मिळाला आहे. काही व्यापारी शेतकऱ्यांना ढगाळ हवामानाची भीती घालून दर पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे द्राक्षबागायतदार संघ, शेतकरी संघटनांकडून आवाहन केले आहे.
खानापूर घाटमाथ्यावरील पळशी, हिवरे, बलवडी (खा), सुलतानगादे, करंजे, बेनापूर या गावात निर्यातक्षम व देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या द्राक्षबागांचे प्रमाण जास्त आहे. अनेक द्राक्षबागा विक्री योग्य झाल्या आहेत. त्यामुळे या भागात अनेक द्राक्ष व्यापारी दाखल होत आहेत. डिसेंबरमध्ये सुलतानगादे परिसरातील द्राक्ष बागायतदारांनी चार किलोस ४०० ते ४२० याप्रमाणे द्राक्षमाल विक्री केला आहे. सध्या बलवडी (खा) परिसरातील द्राक्षबागांची चार किलोस ३६० ते ३८० रुपयाप्रमाणे काढणी सुरू आहे.
मात्र काही व्यापारी ढगाळ वातावरण व थंडी यामुळे द्राक्षमालाला उठाव नसल्याचे सांगून द्राक्षबागा कमी भावाने खरेदी करू लागले आहेत. यावर्षी अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे हैराण झालेल्या द्राक्ष बागायतदारांची चिंता या अफवामुळे वाढली आहे. याचा फायदा घेऊन व्यापारी परिसरातील द्राक्षबागा कमी दराने खरेदी करत आहेत.