सध्याच्या या दिवसात दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. हातकणंगले तालुक्यात असाच एक चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे. चोरटयांनी चक्क मंदिरातील दानपेटीवरच डल्ला मारला आहे. गेली अनेक दिवस पट्टणकोडोली, हुपरी परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
मोटार सायकल चोरी, घरफोडी आणि इतर छोट्या-मोठ्या चोन्यांसह चोरट्यांना मंदिरात चोरी करण्यात चांगलीच धन्यता वाटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील दीड एक वर्षात पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ परिसरात चोरट्यांनी मंदिरातीलच दानपेटींवर आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत असल्याने मंदिराचे पुजारींसह भाविकांत आणि नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील कोल्हापूर रोडवरील अलाटवाडीमध्ये असणाऱ्या श्री चैतन्य गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. मंदिराच्या लोखंडी शटरचे कुलूप उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि समोरच असणारी दानपेटी उचकटून काढून लंपास केली.
मंदिरातील अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये असलेली दानपेटी घेऊन चोरटे पलायन झाले आहेत. दरम्यान, पोलिस प्रशासनाने गस्त वाढवून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे..