सध्या अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली पहायला मिळत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच त्याचबरोबर अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. इचलकरंजीतील शहापूर खंजिरी औद्योगिक वसाहत ते दत्तनगर मुख्य मार्गावर एम एस इ बी कडून विद्युत वाहिनी टाकण्यासाठी उत्खनन सुरू आहे. जेसीबीच्या साह्याने करण्यात आलेल्या उत्खनामुळे रस्ता अरुंद झाला असून उकरलेल्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात दगड, मुरूम आणि खडक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून काही महिन्यांपूर्वी एका अपघातात एकाचा मृत्यू ही झाला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीच या कामास विरोध देखील दर्शवला होता. खंजिरे औद्योगिक वसाहतीकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्ता खराब असल्यामुळे छोटे-मोठे अपघात सातत्याने घडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव शेट्टी आणि शिवाजी भस्मे यांनी प्रशासनाला लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून सुरक्षित मार्ग बनवण्याची मागणी केली. अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असा इशारा देण्यात आला आहे.
