सर्वसामान्य जनतेच्या अनेक विविध मागण्या असतात या मागण्याचा नेतेमंडळींकडून पाठपुरावा देखील केला जातो तर काही वेळा याकडे दुर्लक्ष देखील होते. त्यासाठी नागरिक उपोषण सुरु करतात. ऐतिहसिक बिंदू चौकात कोणतेही राजकीय, धार्मिक, संस्था, संघटना यांना ठरावानुसार कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आलेली असताना देखील बिंदू चौकात अनेक राजकीय धार्मिक, आंदोलने यासारखे कार्यक्रम नियम डावलून केले जात आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यासाठी संविधानिक मार्गाने ३ सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाच्या वेळी निवेदन न स्विकारता प्रशासक निघून गेल्या असता या उलट संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याच्या निषेधार्थ आणि प्रशासकांवर कारवाई करण्याकरिता संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे व रिपाई आठवले गटाचे जिल्हा सचिव सतिश माळगे यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी २६ जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना निलेश बनसोडे म्हणाले, बिंदू चौक हा सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रतीक आहे. संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.
उलट महापालिका प्रशासनाने त्यांनी स्वतः केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करता एकप्रकारे कायदा मोडला आहे. तरी या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बैठकीत चर्चा झाली असून या प्रश्नी तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच रहाणार असल्याचे सांगितले.