शक्तिपीठबाबत माणगावात ग्रामपंचायतीच्या दुहेरी भूमिकेबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया

सध्या शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा खूपच जोर धरत आहे. अनेक भागात याला विरोध तर काही भागात याला पसंती दर्शवली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही, असे वक्तव्य तत्कालिन पालकमंत्री तथा विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं होतं. त्यांनी दाखवलेल्या विरोधामुळेच त्यांची रवानगी वाशिम येथे पालकमंत्री म्हणून करण्यात आली.तर कोल्हापूरचे पालकमंत्रीपद प्रकाश आबिटकर यांच्याकडे देण्यात आले.

पण त्यांनी देखील जिल्ह्यातील हा महामार्ग रद्द झाला आहे, असे वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी त्यांनी केले होते. पण आता हातकणगंले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतमध्ये राज्य शासनाच्या संदिग्ध भूमिकेप्रमाणेच सध्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीने एकाच सभेत विरोध दुसऱ्या सभेत महामार्गास मंजूरी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. तर यावरून गावातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध होत असल्यानेच जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग वगळण्यात आला आहे. पण याबाबत राज्य शासनाची भूमिका संदिग्ध दिसत आहे. अशातच प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांनी शक्तिपीठ महामार्ग व्हावा, अशा ठराव केल्याने गावात एकच तणाव निर्माण झाला आहे. पण याआधीच शक्तिपीठ महामार्ग रद्द बाबत ठराव करण्यात आला होता. आता अशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या दुहेरी भूमिकेबाबत शेतकरऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.