जीबीएस (GBS) आजाराची लक्षणं आणि खबरदारी, उपाय काय? सर्व माहिती…..

सध्या अलीकडे GBS या आजाराची जोरदार चर्चा आहे. पुण्यानंतर आता सांगली, कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील गीयन बारे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. आज आपण याची लक्षणे, कारणे तसेच यावर उपाय व कोणती खबरदारी घ्यायची याविषयी जाणून घेऊ…

गीयन बारे सिंड्रोम कशामुळे होतो?
हा रोग अतिशय दुर्मिळ आहे. साधारण 78 हजार लोकांपैकी एकाला हा सिंड्रोम होतो आणि तो का होतो, याची सगळी कारणं अजून पूर्णपणे समजलेली नाहीत. पण बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शननंतर हे होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती शरीरावर हल्ला करते.

लक्षणं
गीयन बारे सिंड्रोममध्ये काय होतं, तर एरवी परकीय विषाणू वा बॅक्टेरियांवर हल्ला करणारी तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्तीच आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. परिणामी नसांना प्रभावीपणे सिग्नल्स पाठवता येत नाहीत. आणि मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर आणि त्यांच्या कामावर परिणाम होतो. थकवा, हातापायाला मुंग्या येणं – झिणझिण्या येणं हे याचं लक्षण असू शकतं. पायांपासून याची सुरुवात होते आणि नंतर ही लक्षणं हात – चेहऱ्यापर्यंत पसरतात. काहींना पाठदुखी होते. यामुळे स्नायू कमकुवत होतात, हाता- पायांतलं त्राण जातं वा संवेदना जातात, श्वास घ्यायला – गिळायला त्रास होतो.

कोणत्याही वयातल्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. पण त्यातही मोठ्या माणसांमध्ये आणि त्यातही पुरुषांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आढळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलंय. काही रुग्णांमध्ये GBSअतिशय गंभीर होऊ त्यातून पॅरालिसीस वा श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, पण अगदी गंभीर स्थितीपर्यंत गेलेले रुग्णही यातून पूर्ण बरे झाले आहेत.

खबरदारी, उपाय
तर आरोग्य विभागागानं लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, त्यासाठी पाणी उकळून प्यावं. तसंच, अन्न स्वच्छ आणि ताजं असाव, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा आणि शिजलेलं व न शिजलेलं अन्न एकत्र न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.