सध्या अनेक भागात चोरीच्या प्रकारात वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगोला तालुक्यात देखील चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. आठवडी बाजारात तर चोरटे धुमाकूळ घालताना दिसत आहेत. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सुनंदा लक्ष्मण गोडसे रा. लक्ष्मी नगर महुद ता. सांगोला यांनी पोलीसात अज्ञात एक स्त्री व पुरुष अश्या दोघांविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ह्या दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महूद बु ! (ता. सांगोला) येथे थांबल्या असता, एक अनोळखी स्त्री व एक अनोळखी पुरुष असे दोघे पाढ-या रंगाच्या कारमध्ये आले. फिर्यादी यांना लोटेवाडी गावचा रस्ता कोठे आहे? आम्ही तुम्हाला लक्ष्मीनगर येथे सोडतो असे सांगून कारमध्ये बसवले. लक्ष्मीनगर जवळील सराटे नर्सरी जवळ कारमधून उतरत असताना, फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व सोन्याचे माळ गाडीतील अनोळखी महिला व पुरुष यांनी गळ्यातून हिसकावून काढुन घेतले, असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी सांगोला तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची बिगडत चाललेली परिस्थिती पाहता, तात्काळ कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवून गुंडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणारा वरिष्ठ कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. भरदिवसा लुटीची घटना घडल्यामुळे सांगोला तालुक्यातील महिला वर्ग व शालेय विद्यार्थीमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
नुकतीच वाकी- शिवणे येथे अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी सरपंच तक्रारकर्त्यास पोलिसांसमोर दमदाटी करून धमकवले असल्याची घटना घडली होती, यामुळे सांगोला तालुक्यातील चोर, वाळू तस्कर ,अवैध व्यवसायिक यांना पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
