रविवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी अनेक प्रश्न समस्या उपस्थित करण्यात आले. आमदारांनी अनेक प्रश्न बेधडक मांडले. सध्या समृद्धी महामार्ग खूपच जोर धरत आहे. याला काही ठिकाणी मंजुरी तर काही ठिकाणी विरोध देखील दर्शविला जात आहे. समृद्धी महामार्गासाठी जमिनीला बाजारभावाच्या चौपट मोबदला देण्यात आला. परंतु, नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना फक्त दुप्पटच मोबदला का? कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही जमिनीच्या मोबदल्यात चौपट भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने आणि चंद्रदीप नरके यांनी केली. यावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून पाठवण्याचे आश्वासन दिले.
आमदार राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक यांनी महापालिकांच्या शाळांचा विषय उपस्थित केला. महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावा, अशी मागणी केली. यावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
