आ. जयंत पाटील यांना केले जाहीर आवाहन, भाजपची वाढणार डोकेदुखी……

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली सर्वानीच पाहिलेली आहेत. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे प्रत्येकाचेच लक्ष लागलेले आहे. आतापासूनच तयारीही दर्शवली जात आहे. मागील 40 वर्षापासून जतच्या नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर किंगमेकर ते किंग असा प्रवास करणारे जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ज्या पक्षात ते आहेत तेथे प्रामाणिक काम करणे, पक्षाचे पटले नाही तर जनता हाच पक्ष म्हणून सडेतोड भूमिका मांडण्याचा त्यांचा हा स्वभाव. त्यांचा हा स्वभावच भाजपमध्ये नडला. भाजपच्या भूमकेवर जगतापांनी अनेकदा थेट तोफ डागली, पक्षाचा राजिनामा देत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा जाहीर प्रचार त्यांनी केला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही गोपीचंद पडळकरांना विरोध करत भाजपवर निशाणा साधला. जगतापांनी भाजपला अगोदरच सोडचिठ्ठी दिलेली असताना भाजपने त्यांचे निलंबन केले. जगताप विरुद्ध भाजप असा उभा संघर्ष लोकसभेपासून सुरू आहे. लोकसभेला संजयकाका पाटील तर विधानसभेला गोपीचंद पडळकर यांना जगतापांनी विरोध केला. जगतापांच्या विरोधाला भाजपने नाकारले. राजकारणातील चाणक्य असलेले जगतापांनी भाजप विरोधात खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे.

माजी खासदारांबरोबर त्यांची एक बैठक झाली असुन त्यानंतर संख येथे स्व. बसवराज पाटील यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी जगतापांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.खुद्द शरद पवारांनी जगतापांना पक्षाचे काम करा अशी ऑफरही दिली आहे. भाजप विरोधातील जगतापांनी टाकलेले डावपेच जर यशस्वी झाले तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

जतचे माजी आमदार विलासराव जगतापांची भाजपने गेम केल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच जगतापांनी जिल्ह्यातील भाजप विरोधात मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. माजी खासदारांबरोबर त्यांची बैठक झाली असून खुद्द देशाचे माजी मंत्री शरद पवार यांच्या समोरच जगतापांनी माजी मंत्री, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना जिल्ह्यातील भाजप विरोधात मोट बांधा, नेतृत्व करा असे जाहीर आवाहन केले आहे.