बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यावेळी आपण कितीही प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सराव केला असला तरीसुद्धा परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर घाईगडबडीत आपण अनेक चुका करतो. आपला पेपर चांगला आणि टापटीप असेल तर पेपर तपासणारे शिक्षकही मार्क देताना विचार करतात. पेपरमध्ये जर चुका खाडाखोड किंवा गजबजलेला असेल तर तपासणाऱ्याचा गोंधळ उडतो अशावेळी उत्तर बरोबर लिहूनही मार्क कापले जाण्याची शक्यता असते. अनेक वेळा शाळा-कॉलेजमध्येही पेपर कसा सोडवावा यावर खास एक तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं मात्र तरीही बऱ्याचवेळा पेपर लिहिताना चुका होतात. अशावेळी घाबरून न जाता काही सोप्या आणि साध्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण पाहूया की पेपर सोडवताना नेमकं काय करायचं.
भाषा, इतिहास भूगोल किंवा सर्वात जास्त लिहिण्यासाठी असणारे विषय या विषयांचा पेपर सोडवताना घ्यायची काळजी
1. पेपर सोडवताना काय प्रश्न क्रमांक आणि त्यातील उपप्रश्नाचे क्रमांक हे नीट लिहावेत. यासोबत नवीन प्रश्न नव्या पानावर लिहावा. एका प्रश्नात 4 उप प्रश्न असतील तर एका पानावर सोडवले तरीही चालतील मात्र क्रमांक चुकवू नये. प्रत्येक उप-प्रश्नानंतर एक ओळ सोडावी. यामुळे पेपर सुटसुटीत दिसतो.
2. पेपर सोडवताना आधी सोपे प्रश्न किंवा आधी कमी लिहिण्यासारखे मार्क मिळवून देणारे प्रश्न शांतचित्तानं सोडवावेत. त्यांना वेळ कमी लागतो. मोठे अथवा अधिक मार्कांसाठी असणारे प्रश्न किती शब्द लिहायचे हे आधी ठरवून घ्यावं.
3. बऱ्याचवेळा आपल्याकडे मुद्दे खूप असतात अशावेळी क्रमांक टाकून मुद्दा आणि त्यामध्ये दोन ते तीन ओळीमध्ये उत्तर मांडण्याचा प्रयत्न करावा.
4. योग्य तिथे आकृती, ट्री डायग्राम किंवा चार्ट काढावा. यामुळे तुम्हाला उत्तर लिहिताना फायदा होईल. आकृत्यांना पेन्सिलिनं चौकोन करावा. आकृत्यांमध्ये खाडाखोड नसावी. याशिवाय पेपरमध्ये खाडाखोड झाली तर चार वेळा एकाच ठिकाणी न खोडता एक काट मारून पुढे जावं. एकच शब्द दोन ते तीन वेळा गिरवणं टाळावं.
5. शक्य असल्यास पेपर लिहिताना जेल पेन किंवा शाईपेनाचा वापर टाळावा कारण चुकून पाणी अथवा द्रव पदार्थ सांडला किंवा शाई पसरली तर लिहिलेली अक्षरं पुसण्याची भीती असते.
गणित, भूमिती, विज्ञान यांसारखे विषय सोडवताना काय काळजी घ्यावी.
1. गणिताचा पेपर सोडवताना खाडाखोड आकडेमोड होते. अशावेळी पेपरच्या मागच्या बाजूला रफ पेज नावानं लिहून कच्च गणित मांडावं. खाडाखोड झाल्यास एक आडवी किंवा तिरकी रेष मारून पुढे लिहायला सुरुवात करावी. सूत्र वापरली अथवा एखादा वेगळा फॉर्म्युला वापरला असेल तर त्याला खाली अधोरेखित करावे.
2. भूमिती, विज्ञान, भूगोल यांसारख्या विषयांमध्ये आकृती काढण्याची संधी असते तिथे आकृत्यांचा आवश्य वापर करावा. आकृती पेन्सिलिनं सुबक काढावी. त्याला योग्य पद्धतीनं नावं द्यावीत. त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण लिहावं.
3. गणितामध्ये शक्यतो एक गणित अथवा सूत्र एका पानावरून दुसऱ्या पानावर जात असेल त्याचा प्रश्न क्रमांक लिहावा.
4. थेअरम असल्यास त्याची आकृती काढून तो व्यवस्थित मांडणं अपेक्षित आहे. गणित सोडवताना शक्यतो एका पानावर एक गणित अशा हिशोबानं सोडवावं. आपला पेपर साधारण 30 ते 35 पानांचा असतो. याशिवाय सप्लिमेंटची सुविधा असते. त्यामुळे पेपर सुटसुटीत आणि स्वच्छ वाटेल असा सोडवा. त्याचा परिणाम आपल्या गुणांवर होत असतो. अक्षर बारी किंवा फार मोठं असेल तर मोकळं आणि योग्य जागा सोडून लिहावं. ज्यामुळे पेपर दिसायला सुटसुटीत दिसेल.