विट्यातील ड्रग्ज प्रकरणाचा आकाचा आका कोण? अटक केलेल्या मुलाला बस्तान बसवण्यासाठी कोणी मदत केली ? त्या मुलाच्या फायनान्स कंपनीमध्ये कुणाचा फोटो आहे. कुणी त्याच्या फायनान्स कंपनीचे उद्घाटन केले आहे ? असे अनेक सवाल आणि आरोप करत आमदार सुहास बाबर यांनी माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांच्यावर पलटवार केला. आमदार सुहास बाबर म्हणाले, निवडणुकीवेळी मतदार संघाने तुम्हाला नाकारले म्हणून एका झटक्यात लगेच सोडता उडता खानापूर, उडता विटा म्हणून विटा शहराची आणि मतदारसंघाची बदनामी करू नका.
ड्रग्ज प्रकरणाच्या मुळापर्यंत मी गेलो नाही तर या घटना परत परत घडतील.आणि त्याची भली मोठी किंमत विटा शहराला मोजावे लागेल. ती मोजायला लागू नये म्हणून प्रसंगी मला कितीही संघर्ष करावा लागला कितीही संकट माझ्यावरती आले तरी देखील मी या ड्रग्ज प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रग्ज, अंमली पदार्थांची तस्करी करणारे लोक विट्यातून हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
त्या घटनेच्या खोलापर्यंत जाऊन सखोल तपास व्हावा म्हणून ज्या गोष्ठी आमदार म्हणून मी करायला पाहिजे होत्या. त्या सगळ्या गोष्टी घटना घडल्यापासून ते या क्षणापर्यंत आमदार म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मला असं वाटतं फक्त पत्रकार परिषद घेऊन ही गोष्ट साध्य होत नसते त्यासाठी जबाबदारी घेऊन काम करावं लागतं. आणि ती जबाबदारी मी घेतली आहे. मी गेल्या सहा वर्षापासून जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करत आहे.