एमडी ड्रग्जप्रकरणी विट्यातील महिला कारखानदाराला अटक; पाच दिवस कोठडी

विटाजवळील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमधील रामकृष्ण माऊली इंडस्ट्रीज हा बंद कारखाना कोणत्याही परवानगीविना एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी भाड्याने दिल्याबद्दल गोकुळा विठ्ठल पाटील (वय ४७, रा. पाटील वस्ती, विटा) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी अटक केली. पाटील यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची कोठडी सुनावली. 

अधिक माहिती अशी कि, कार्वे औद्योगिक वसाहतीत माऊली इंडस्ट्रीज या कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकाने छापा टाकून २९ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी आतापर्यंत सहाजणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा कारखाना संशयितांनी अत्तर तयार करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतल्याचे सांगितले होते. आता कारखान्याच्या मालक गोकुळा विठ्ठल पाटील यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गोकुळा पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता शेड भाड्याने दिल्यामुळे त्याठिकाणी संशयितांनी एमडी ड्रग्जचे उत्पादन सुरू केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक तपासात गोकुळा पाटील यांना बेकायदेशीर बाबींबद्दल मंगळवारी अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी विटा येथे ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी करून रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसाची कोठडी सुनावली.