सांगोल्यात मुस्लीम समाजबांधवांचे बेमुदत उपोषण

सांगोला नगरपरिषद हदीत असणारी उर्दू शाळा पाडुन सदरची जागा नगरपरिषदेने इतर समाजाला दिली आहे. ही जागा उर्दू शाळेसाठी पर्यायाने मुस्लीम समाजाची असून, या जागेबाबत सांगोला नगरपरिषदेत झालेले ठराव रद्द करून ही जागा मुस्लीम समाजाला देण्यात यावी, या मागणीसाठी सांगोला शहरात मुस्लीम समाजबांधवांनी सांगोला नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, उपोषणाला इतर सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जामा मशिदीपासून २० ते २५ फुटांवर असलेली ही जागा पूर्वी उर्दू शाळेची म्हणजेच मुस्लीम समाजाची होती.

अनेक वर्षे ही शाळा बंद अवस्थेत असल्याने, ही उर्दू शाळा मागील सहा महिन्यांपूर्वी पाडण्यात आली आणि नगरपरिषदेने या जागेबाबत रीतसर ठराव करून ही जागा इतर समाजाला सभागृह बांधण्यासाठी दिली आहे. सिटी सर्व्हे क्रमांक १७२९ बाबत सांगोला नगरपरिषदेत झालेले सर्व ठराव रद्द करून, ती जागा मुस्लीम समाजाला देण्यात यावी, यासाठी सांगोला नगरपरिषदेसमोर माजी शब्बीर खतीब, शब्बीरभाई तांबोळी, माजी नगरसेवक आलमगीर मुल्ला, बुद्ध भीमराज संघटनेचे बापूसाहेब ठोकळे, कमरुदिन खतीब, इमरान फारुकी, साहिल खतीब, पोपट खाटीक, मज्जीद खतीब, वजीर खतीब, आलम मुलाणी यांच्या सहसमाजबांधव उपोषणास बसले आहेत.