आष्टा पालिकेने कर थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत नळ कनेक्शनधारकांचे नळ कनेक्श तोडले जात आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी तत्काळ घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. आष्टा नगरपरिषद हदीतील मालमत्ताधारकांकडून सन २०२४- २५ करीता मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी व चालूसह वसुली करण्याची मोहीम आष्टा नगरपरिषद मार्फत सुरू आहे.
नगरपरिषद प्रशासनाकडून सन २०२४ २०२५ वर्षाच्या कराच्या मागणीची देयके सर्व मालमत्ताधारकांना बजावण्याची कारवाई पूर्ण झालेली आहे. चालू वर्षी १०० टक्के मालमत्ता कराचे उदिष्ट नगरपरिषदेने ठेवले आहे. यासाठी श्रीमती निर्मला राशिनकर, प्र. मुख्याधिकारी, आष्टा नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली मोहीम सुरू आहे. विशेष वसुली मोहिमेचा भाग म्हणून सर्व थकबाकीदारांना जप्तीपूर्वी नोटिसा बजावण्याची कार्यवाही पूर्ण केलेली आहे. आजपासून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष पथकांचे निर्मिती करून कर वसुलीसाठी मोहीम सुरू आहे.