गावातील दारू विक्री, जुगार बंद करावेत, म्हणून ग्रामसभेत ठराव! चक्क पोलिसासमोर सरपंचाला अवैद्य व्यवसायिकवाल्यांची जिवे मारण्याची धमकी

सध्या अनेक भागात अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु आहेत याला तरुणाई बळी पडत आहे. गावातील अवैधरीत्या दारू विक्री, जुगार, मटका बंद करावेत, म्हणून ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केल्याचा राग मनात धरून गावातील अवैद्य व्यवसायिकांनी चक्क पोलिसासमोर सरपंचाला हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी, सरपंच अनिल शिवाजी हंबीरराव (रा. वाकी शिवणे, ता. सांगोला) यांनी अजित बुचडे, नीलेश होवाळ, सुनील चव्हाण, सागर हेगडे व सुंदर काटे यांच्या विरुद्ध सांगोला पोलिस ठाण्याला तक्रारी अर्ज दिला आहे.

सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावात खुलेआम अवैधरीत्या दारू विक्री, तसेच जुगार मटका व गुटखा व्यवसाय तेजीत चालू आहे. सदर अवैध व्यवसायामुळे गावातील नागरिक, महिला, शाळकरी मुलांना त्रास होत आहे. याबाबत ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत सदरची व्यवसाय बंद करावेत, म्हणून ग्रामसभेने व महिला, ज्येष्ठ, नागरिकांनी एकमताने ठराव मंजूर केला होता.

सरपंच अनिल हंबीरराव यांनी पोलिस अधीक्षक सोलापूर दारूबंदी अधिकारी सोलापूर उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा व पोलिस निरीक्षक सांगोला यांना ग्रामसभेच्या ठरावाची नक्कल जोडून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे. दखल घेऊन पोलिस कर्मचारी दारू विक्रेत्यावर धाड टाकण्यासाठी गेले असता, चक्क पोलिसांसमोर सरपंच अनिल हंबीरराव यांना हातपाय तोडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.