इचलकरंजी शहरात अनेक अवैद्य धंदे तसेच गुन्हेगारीच्या प्रमाणात देखील भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसत असतानाच आग लागण्याच्या घटना देखील घडू लागल्याने आर्थिक नुकसानीला देखील सामोरे जावे लागते. इचलकरंजी येथील विक्रम नगर परिसरातील गारमेंट कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत गारमेंटमधील मोठ्या प्रमाणात तयार माल तसेच इतर साहित्य जळून खाक झाले.
जवळपास तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विक्रम नगर परिसरातील गौतम कुमार पुरोहित यांच्या मालकीचे गारमेंट कारखाना आहे. या कारखान्यात जवळपास 40 मशनरीची युनिट आहे. या ठिकाणी परकर तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते.
पुरोहित यांच्या थोरल्या बंधूंचे निधन झाल्याने गौतम कुमार हे परगावी गेले होते. त्यामुळे कारखान्यात डिलिव्हरी न झाल्याने मोठ्या प्रमाणात माल राहिला होता. या सर्व मालाची डिलिव्हरी उद्या केली जाणार होती.
मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कारखान्यातून धूर येत असल्याचे परिसरातील कामगारांच्या निदर्शनास आले. आगीची माहिती कळतच इचलकरंजी महानगरपालिका व कुरुंदवाड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
परंतु कापडाचा माल असल्याने आग वेगाने पसरत गेली. तब्बल पाच ते सहा तासानंतर परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे तीन ते चार कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.