उड्डाणपुलावरुन बाराचाकी ट्रक महामार्गावरून कोसळला सेवा रस्त्यावर, सुदैवाने जिवितहानी नाही

सध्याच्या काळात अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विविध कारणांमुळे अपघात होत असल्याने वाहन चालविताना वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय  महामार्गावर सोमवारी दुपारी ती तीनच्या सुमारास शिरोली औद्योगिक वसाहतीतील मयूर फाटा येथील उड्डाणपुलावरुन १२ चाकी ट्रक महामार्गावरून सेवा  रस्त्यावर कोसळला. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी  झाली नाही, पण ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सविस्तर माहिती अशी की,  नवनाथ खंडू खोतमाळी (रा. शिरूर, जिल्हा पुणे) हा चालक सोमवारी सकाळी ६ वाजता सुपा, अहमदनगर येथून कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या भरून गडमुडशिंगी ता. करवीर येथे येण्यासाठी निघाला होता.

दुपारी तीनच्या सुमारास हा ट्रक शिरोली औद्योगिक वसाहतीतील मयूर फाटा येथे आला असता चालकाला झापड आली व अचानक दुचाकी आडवी आल्याने ड्रायव्हर चलबिचल झाल्याने गाडीचा ताबा सुटला आणि ट्रक थेट महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला. यावेळी सेवा रस्त्यावरून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. हा ट्रक अहमदनगर येथील रोकडे ट्रान्सपोर्टचा असल्याचे समजते. या अपघातात ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

शिरोली एमआयडीसी मुळे हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो. पण सोमवार सुट्टी असल्याने वर्दळ कमी होती. घटना समजताच शिरोली एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सेवा रस्त्यावर कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांचा खच पडला होता. काही फुकट्यांनी कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या लंपास केल्या. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवली. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले. दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी ट्रक कोसळला होता. त्यामुळे हा उड्डाणपूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.