आजपासून ताकारीत कमळभैरव देवाची यात्रा, विविध कार्यक्रमांचे आयोजन

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. गावाकडे शहरात कामानिमित्त स्थायिक झालेले लोक परतत असतात. वाळवा तालुक्यातील ताकारी येथील ग्रामदैवत श्री कमळभैरव देवाची यात्रा दि. १२ व १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यात्रेनिमित्त दंडस्नान, पालखी सोहळा, दिवा निघणे या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच करणुकीचे कार्यक्रम व निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे, अशी माहिती कमळभैरव यात्रा कमिटीतर्फे देण्यात आली आहे.

आज १२ फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी दंडस्नान पालखी सोहळा व सायंकाळी ५. ४५ मिनिटांनी दिवा निघण्याचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी मास्टर तानाजी भोसले बाघेरीकर, लोकनाट्य तमाशा होणार आहे. दुपारी ३ वाजता निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे. सकाळी ९ ते १२ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय येथे कुस्त्या नोंदविण्यात येणार आहेत. मंगळवार १८ रोजी महिलांसाठी सुप्रसिद्ध वैभव ऑर्केस्ट्रा होणार आहे.
यात्रा कमिटीचे सतीश सावंत, युवराज पवार, पद्माकर भांबुरे, भरत माने, शिवाजी गुरव, कुस्ती समिती अध्यक्ष पै. नितीन सावंत यांच्यासह सर्व सदस्य, सरपंच प्रा. प्रणाली पाटील, उपसरपंच प्रणिता पेठकर व सदस्य, तालीम मंडळ या यात्रेचे संयोजन करीत आहेत.