हातकणंगले व शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन……

सध्या पाण्याची टंचाई अनेक भागात आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. जसजसा उन्हाळा जवळ येत आहे तसतशी पाण्याच्या टंचाईचा सामना जोरदार करावा लागतो. पाण्यासाठी वेळोवेळी मागणी देखील केली जाते. सध्या हातकणंगले तसेच शाहूवाडी तालुक्यात पाण्याच्या टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.मुंबई विधान भवन येथे जलसंपदा विभागाच्या विविध विषयांबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस आमदार डॉ. विनय कोरे व दलितमित्र आ.डॉ.अशोकराव माने यांनी उपस्थितीत राहून चर्चा केली. कडवी नदीवर सावे (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीतून जुळेवाडी खिंडीत पाणी उपसाव्दारे उचलून बंदीस्त पाईपलाईनव्दारे लाभक्षेत्राबाहेरील गोगवे, बजागेवाडी, करंजोशी, आरुळ, आंबर्डे, ओकोली, करपेवाडी, परखंदळे, सावर्डे, सोनवडे, शित्तूर, साळशी, पिशवी, सुपात्रे, खुटाळवाडी, बोरिवडे, आवळी, नावली, जेऊर, आपटी, बोरपाडळे व इतर गावे येथील जवळपास ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याकरीता शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजना राबवून बंद पाईपद्वारे पाण्याची वितरण व्यवस्था करण्यात यावी,

तसेच वारणा नदीवरील हातकणंगले तालुक्यातील खोची येथील को. प. बंधान्यामधून रामलिंग पठार येथे पाणी उपसा करून हातकणंगले तालुक्यातील आळते, तारदाळ, मजले, नरंदे, नेज, कुंभोज, सावर्डे, कापूरवाडी, मिणचे,  तासगाव, मौजे वडगांव, अतिग्रे, चोकाक, मनपाडळे, अंबपवाडी, संभापूर, रुई, साजणी, तिळवणी, रुकडी, हेरले व नागांव गावाच्या परिसरात येणाऱ्या अंदाजे १० हजार हे. सिंचनापासून वंचित क्षेत्रास शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करुन बंद पाईपलाईनच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्यात यावे, अशीही मागणी आमदार डॉ. विनय कोरे व दलितमित्र आ. डॉ. अशोकराव माने यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण  विखे पाटील यांच्याकडे केली.

 या दोन्ही मागण्याच्या संदर्भात शासन स्तरावर प्रस्ताव सादर करून शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून लागेल ते सहकार्य करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सचिव यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.