आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभेचे वेळापत्रक जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक निवडीची यादी जाहीर केली आहे. या निरीक्षक निवड यादीत कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांची उत्तर मध्य-मुंबई या ठिकाणी निरीक्षक म्हणून निवड केली आहे.दरम्यान, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज्यातील 23 मतदार संघातील निरीक्षक निवड यादीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा या निवडणूक निरीक्षक यादीत समावेश नाही.
निवड यादीनंतर या दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे चित्र गडद झाले आहे. भाजपकडून दोन पैकी एका मतदारसंघावर दावा केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांमध्ये अस्वस्थता होती. मात्र या निवड यादीमुळे काही अंशी विद्यमान खासदारांना दिलासा मिळाला आहे.