ट्रॉलीला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर

सध्या अलीकडे खराब रस्त्यांमुळे, वेगाने गाडी चालविणे तसेच अन्य कारणांनी अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. असाच एक हातकणंगले तालुक्यात घडला आहे.
रस्त्याच्या कडेला लावलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला दुचाकीची धडक बसून शिवाजी पांडुरंग अतिग्रे (रा. लाटवडे, ता. हातकणंगले) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेले किरण शामराव नाईक (रा.लाटवडे) हे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या अपघाताची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे.

वडगाव-आष्टा रस्त्यावर भादोलेच्या हद्दीत वारणा हॉटेलजवळ उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या कडेला लावून दुसरी ट्रॉली आणण्यासाठी ट्रॅक्टरचालक गेला होता. शिवाजी अतिग्रे हे दुचाकीवरून किरण नाईक यांच्यासह बागणीहून भादोलेकडे येत होते. रस्त्याकडेची ट्रॉली लक्षात न आल्याने दुचाकीची ट्रॉलीला धडक बसली. यात डोक्याला मार लागल्याने अतिग्रे यांचा जागीच मृत्यू झाला तर नाईक गंभीर जखमी झाले. नाईक यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ट्रॉलीला रिफ्लेक्टर चिन्ह अथवा पडदा न लावता रस्त्यावर निष्काळजीपणे ट्रॉली उभी करून अतिग्रे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुखदेव शंकर पाटील (27, रा. भादोले, ता. हातकणंगले) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गजानन घोडके करत आहेत.