सन २००० साली ७८.५९ कोटी रुपयांची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु पुढील पाच वर्षे या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्याने २००५ साली प्रशासकीय म ान्यता व्यपगत झाली होती सन २०१९ साली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांना या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केला. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतीसाठी उजनी धरणातून पाणी मिळावे यासाठी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी 1995 ते 99 दरम्यान ते आमदार असताना प्रयत्न केले होते. यावेळी त्यांनी उजनी उपसा सिंचन योजना मंजूर केली होती.
मात्र ते आमदार पदावरून पायउतार होताच ही योजना धुळखात पडली होती. सतत १५ हून अधिक वर्षे या योजनेवर एकही रुपया खर्च न झाल्याने शासकीय दरबारी उजनी उपसा सिंचन योजना काळ्या यादी समाविष्ट झाली. यामुळे सांगोला तालुक्यातील शेतीला उजनीचे पाणी मिळेल ही आशाच मावळली होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील हे पुन्हा सांगोला विधानसभेचे आमदार झाले आणि त्यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्धार केला.
तत्कालीन सरकारचे लाडके आमदार असलेल्या शहाजीबापू पाटील यांनी आपले राजकीय वजन वापरून शासकीय यादीत बंद असलेली ही योजना पुन्हा मंजूर करून आणून या योजनेचे नामांतर करून पूर्वी उजनी उपसा सिंचन योजना असलेल्या या योजनेला स्व बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना असे नाव दिले. आणि या योजनेसाठी ८८४ कोटींची मंजुरी घेतली. या योजनेतून सांगोला तालुक्यातील शेतीला तब्बल २ टीएमसी इतके पाणी मिळणार आहे. या पाण्यातून २२ गावांतील तब्बल १३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेचा सुमारे ३०० कोटींचा पहिला टप्पा आता सुरू होणार असून त्याच्याच कामाचे हे भूमिपूजन आज होणार आहे.
आज होणाऱ्या या भूमिपूजन कार्यक्रमाची शासकीय पत्रिका नुकतीच बाहेर पडली असून या पत्रिकेत ज्यांनी बंद पडलेली योजना पुन्हा सुरू केली आणि ज्यांच्या जन्म गावातच हा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांचे नावच नसल्याने शहाजीबापू समर्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
