इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण भारत जैन सभेची पदवीधर संघटनेचा ३५ वा वर्धापन दिन व जीवनगौरव प्रशस्ती प्रदान सोहळा पार पडला. यावेळी स्वर्गीय वसंत भीमगोंडा पाटील कोथळीकर जीवनगौरव माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना सपत्नीक माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे यांना डॉ. साळुंखे, विमलताई देवगोंडा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. ए एन उपाध्ये जैन साहित्य निर्मिती व संशोधन पुरस्कार स्वर्गीय प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी जाहीर झाला असून तो त्यांची कन्या डॉ. सुनिता राजेंद्र गाठ यांना दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राला पदवीधर करण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या शिक्षण प्रसाराचा वसा -वारसा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सक्षमपणे पुढे नेला आहे. पुढची पिढी प्रगत शिक्षण घ्यावी याविषयीची त्यांची कळकळ समाजाला नवी दिशा मिळवून देईल, असे प्रतिपादन निवृत्त कुलगुरू शिक्षण तज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना प्रकाश आवाडे यांनी मला निवृत्त करण्याच्या उद्देशाने जीवन गौरव पुरस्कार द्यायचे कोणी ठरवले असले तरी मी थांबणार नाही. माझे सामाजिक कार्य पुढेही चालू राहील. मी धर्माचरण करणारी व्यक्ती आहे. परंतु आज समाजाने पंचकल्याण सोहळ्यावर लाखोंचा खर्च करण्याऐवजी त्यातील काही रक्कम गावातील शाळा सुधार, शैक्षणिक कार्यासाठी वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. संयोजक संस्थांनी शैक्षणिक संस्था सुरू करून नव्या पिढीला या प्रवाहात पुढे नेण्यासाठी गतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योग निर्यात करणे आणि महिला सक्षमीकरण करणे हे कार्याचे प्रमुख ध्येय यापुढे असणार असल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
