अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या प्रकारात भरमसाठ वाढ होऊ लागलेली आहे. त्यामुळे असुरक्षितता निर्माण झालेली आहे. मुली, महिला यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी नितीन साताप्पा बिराजदार, (रा. धनगर माळ, कोरोची) याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने बिराजदार याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
३ ते १४ फेब्रुवारी दरम्यान संशयित बिराजदार हा फिर्यादी ही कॉलेजला येण्या जाण्याच्या वाटेवर उभे राहुन त्यांचेकडे एक टक बघुन ती स्कुल बसपर्यंत जाईपर्यंत तिचा पाठलाग करून फिर्यादी याची इच्छा नसताना देखील घुटमळत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.
त्यामुळे पिडीत युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली. दरम्यान, इचलकरंजी शहरासह परिसरातील शाळा, महाविद्यालयांसमोर टवाळखोर तरुणांकडून युवतींची छेड काढण्यासह पाठलाग करण्याच्या प्रकारात वाढ झाली असून शाळा सुटण्याच्यावेळेत असे रोडरोमिओ भर रस्त्यात घोळक्याने उभे रहात आहेत. याबरोबरच भरधाव वेगाने वाहन चालवून युवतींना त्रास देण्याचे प्रकारही वाढले आहेत. भरारी पथकाने अशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे..
