महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना व जलजीवन योजने संदर्भात आढावा बैठक पंचायत समिती सांगोला येथे बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी बैठकीचे अध्यक्ष आ.डॉ.बाबासाहेब देशमुख होते.यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेची गेल्या ५ वर्षामधील वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम मोठी असल्यामुळे योजना बंद आहे. योजनेच्या थकबाकीची रक्कम आपत्कालीन परिस्थितीतून शासनाकडून जमा करता येते का यासाठी चर्चा सुरु आहे.
शिरभावी योजनेचे ९० टक्के काम पुर्ण असून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करा, योजना लवकरात लवकरत चालू करण्यासाठी सध्या पाठपुरावा सुरु आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील गेल्या काही वर्षातील जलजीवन योजनेची कामे योग्य पध्दतीने झाली नाहीत त्यामुळे सांगोला तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांची चौकशी करुन बेकायदेशीर कामे करणाऱ्या अधिकाऱ्याना बडतर्फ करावे, आणि ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करणार असल्याचे सांगत, पुढे बोलताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले, जलजीवन कामाची अनाधिकृत कामांची चौकशी, कामे पुर्ण झाल्याची खात्री झाल्याशिवाय बिले अदा करु नयेत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या थकीत विजबिलासाठी तात्काळ त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, ग्रा.पं. कडील थकबाकी तात्काळ भरावी, इतर कार्यालयाचा आढावा लवकरच घेणार याबाबत चर्चा करण्यात आली.
तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामासाठी १०१ कोटी रुपये मंजूर आहे. ८५ गावात मंजूर असून त्यापैकी २० गावात जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्णत्वास आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यावेळी अपूर्ण राहिलेल्या २३ गावातील नागरिकांकडून योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली असता अधिकाऱ्याकडून अपेक्षित उत्तरे न मिळाल्यामुळे नागरिक व अधिकार्यामध्ये मोठी खडाजंगी झाल्याचे पाहण्यास मिळून आले असून बऱ्याच गावांमध्ये योजनेचे कामे न होताच बिले काढली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
बैठकीमध्ये विशेषता मांजरी, वाटंबरे, खवासपूर, शिवणे, अकोला, इटकी, एखतपूर, घेरडी या गावांमधील नागरिकांनी अधिकार्यांना प्रश्नांचा भडीमार करून या योजनेच्या कामांची पोलखोल करून सोडली. यावेळी पत्रकार रविंद्र कांबळे यांनी मांजरी येथील जल जीवन कामासंदर्भात भ्रष्टाचार झाला असल्याबाबत मुद्दा लावून धरला. जलजीवन मिशन योजनेसाठी तालुक्यातील १०२ गावांसाठी ८५ कामे मंजूर आहेत. त्यापैकी २० पैकी पूर्ण असून ६५ कामे अपूर्ण आहेत.
योजनेच्या ८५ गावातील तत्कालीन कामासाठी तालुक्यातील १८ व जिल्ह्यामधील ३४ अशी कामे तत्कालीन कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी संगमताने एकाच एजन्सीला बीड कॅपॅसिटी नसताना सुध्दा दिली असून या एजन्सीमुळे सांगोला तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामाचा बट्ट्याबोळ झाला असून जलजीवन योजनेच्या अनागोंदी कारभाराचा प्रश्न लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील व विधानसभेत आमदार बाबासाहेब देशमुख उपस्थित करावा, अशी मागणी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आले.
जलजीवन कामासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च करून ही सांगोला तालुका हा पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. या जलजीवन कामाची येत्या २५ तारखेपर्यंत सखोल चौकशी करावी. तसेच जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत या कामाचे कोणतेही बिल ठेकेदारांना अदा करू नये अशा सक्त सूचना देत, पाणीपुरवठा योजनेच्या कामासंदर्भात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.