स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेचे काम सुरू होणार असल्याने सांगोल्यातील वंचित १२ गावातील सुमारे १५ हजार ४०० हेक्टर शेतीला बंदिस्त नलिकेद्वारे लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे.त्यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ संपून तालुका कायमस्वरुपी दुष्काळमुक्त होणार आहे, स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. ह. तु. धुमाळ, भीमा कालवा अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामास शासनाने सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली, या योजनेकरिता उजनी धरणामधून दोन टीएमसी पाण्याची तरतूद असून, या पाण्याद्वारे सांगोला तालुक्यातील १२ गावांतील सुमारे १३ हजार ५५ हेक्टर क्षेत्रास व सांगोला शाखा कालवा क्र. ५ अंतर्गत २ हजार ३४५ हेक्टर असा एकूण १५ हजार ४०० हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा लाभ मिळणार आहे. बऱ्याच वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत असून, कायमस्वरूपी दुष्काळ असलेला हा भाग सिंचनाने सुजला-सुफला होणार आहे. पुढील तीन वर्षांत ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
