अनेक विविध कार्यक्रमानिमित्त अनेक विध सामाजिक उपक्रम राबविले जातात. खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथे आदर्श कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जीवनज्योती उद्योग समूहाचे संचालक चेअरमन संतोष जाधव, उद्घाटक युवा उद्योजक साहिलशेठ देवकर, सरपंच चंपाबाई गुरव, प्रभारी प्राचार्य डॉ. निवासराव वरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण जीवन व व समाज जीवनाशी एकरूप होण्याची संधी मिळते. समाजातील वास्तव दर्शन अनुभवास येते. अशा अनुभवातून आपण कार्य करत गेलो की समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची संधी निर्माण होत असते, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी केले. अॅड. वैभव पाटील पुढे म्हणाले की, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांनी आपल्या कामांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या हृदयात स्थान निर्माण करायला पाहिजे.
या सात दिवसाच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी मनाने व शरीराने एकरूप होऊन गावकऱ्यांची सेवा केले तर शिबीर यशस्वी होऊ शकते. परिणामी ग्रामस्थांच्या मनामध्येसुद्धा आपल्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होईल. संतोष जाधव म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी जगण्याचा संकल्प करावा. प्रभारी प्राचार्य डॉ. निवासराव वरेकर म्हणाले की सात दिवसांच्या शिबिराच्या कालखंडामध्ये गावामध्ये जास्तीत जास्त शासनाच्या योजना, श्रम दान, प्रबोधन कार्यक्रम, आरोग्याचे विषय, पर्यावरणात विषयांवर जागृती करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रा. गजानन चौगुले यांनी सात दिवसातील कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.