विट्याजवळील कार्वे औद्योगिक वसाहतीत १७ कारखान्यावर छापे

अंमली पदार्थ विरोधी तपासणी पथकाने अचानक विट्याजवळील कार्वे एमआयडीसीमधील एकूण १७ बंद कारखान्याची आज तपासणी केली. मात्र या कंपन्यांमध्ये काहीही आक्षेपार्ह साहित्य अगर वस्तू सापडल्या नाहीत, अशी माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली. कार्वे हद्दीत औद्योगिक वसाहतीत माऊली इंडस्ट्रीजमध्ये तयार आणि कच्चे एमडी ड्रग्ज सापडले होते. अद्यापही याप्रकरणी चौकशी सुरू आहे. शनिवारी सुरू व बंद अशा एकूण १७ कंपन्यांची तपासणी करण्यात आली.

नायब तहसीलदार एम. पी. साळुंखे, ड्रग्ज इन्स्पेक्टर आर. आर. कारंडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी टी. एस. हरवळ, एमआयडीसी सांगलीचे अनुरेखक एच. टी. मगदूम तसेच विटा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या पथकाने ही तपासणी केली. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २८ जानेवारी २०२५ रोजी कावें एमआयडीसीमधील माऊली इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकून एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला. यामध्ये तब्बल पावणेतीस कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त केले होते.