अनेक कार्यक्रमानिमित्त अनेक विविध कार्यक्रम घेतले जातात. यात अनेक प्रकारच्या स्पर्धा देखील घेतात. वाळवा तालुक्यातील पेठ येथे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अतुल पाटील मित्र परिवार, पेठ व जयंत क्रिकेट क्लब, इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षांखालील भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पारगावच्या विंग्ज स्पोर्टसने इस्लामपूरच्या जयंत क्रिकेट क्लबवर विजय मिळवून जयंत चषकावर नाव कोरले. इस्लामपूरचा जयंत क्रिकेट क्लब उपविजेता ठरला.
विजेत्यास राजारामबापू कारखान्याचे संचालक अतुल पाटील यांच्याकडून रोख १५ हजार, तर उपविजेत्यास रोख १० हजार रुपये व चषक देण्यात आले. वैयक्तिक बक्षिसांमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बोलर, मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी सिरिज बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील १२ संघांनी सहभाग घेतला. बक्षीस वितरणास राजारामबापू कारखान्याचे संचालक अतुल पाटील, कामेरीचे सरपंच रणजीत पाटील अॅड. अभिषेक देवकर, अधिकराव पाटील, कोच कपिल घस्ते, अंबिका घस्ते, संतोष बाबर, तेजस शाह आदींसह खेळाडू व मान्यवर उपस्थित होते.