राज्यात महायुतीचे सरकार असले तरी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आगामी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे संकेत महायुतीच्या घटक पक्षातून मिळत आहेत. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत खा. धैर्यशील माने यांना मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेने दमदार कामगिरी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष दिल्याचे समजते. डॉ. मिणचेकर यांनी शिवसेनेचा विचार कधीही सोडलेला नव्हता. अपरिहार्य कारणास्तव त्यांनी स्वाभिमानीकडून निवडणुक लढविली होती. ते आता मूळ प्रवाहात येत आहेत.
डॉ. सुजित मिणचेकर यांनी विधानसभा निवडणुक स्वाभिमानीच्या चिन्हावर लढवली होती. त्यांना अपयश आले तरी त्यांनी सामाजिक कार्य सुरु ठेवले. परंतु त्यावर मर्यादा येऊ लागल्या. लोकांचा संपर्क ठेवायचा असेल तर सत्तापक्ष महत्वाचा आहे. आणि याचाच विचार करुन त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दरम्यान, मिणचेकर यांच्यासोबत स्वाभिमानीसह ठाकरे सेनेतील काही पदाधिकारी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
मिणचेकरांच्या प्रवेशानंतर शिरोळ तालुक्यातील शेट्टी यांचे आणखीन दोन नेते शिवसेनेत प्रवेश करार असल्याचे कळते. मिणचेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे खा. धैर्यशील माने गटाला मोठे बळ मिळणार आहे.मिणचेकर यांचा होणारा शिवसेना प्रवेश हा याचाच एक भाग मानला जातो. आता पहावे लागेल मिणचेकर यांच्या प्रवेशामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची किती ताकद वाढते.
