जीबीएसने आळतेच्या सुनिल चावरे यांचा मृत्यू, नागरिकांमध्ये मोठी खळबळ

अलीकडे जीबीएस या आजाराने थैमान घातलेले आहे. या आजारामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहेत. नागरिकांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील आळते येथील सुनिल बाबू चावरे (वय ५४) यांचा जीबीएस आजाराने सोमवारी सकाळी मृत्यू झाला. चावरे यांच्यावर प्रथम कोल्हापूर येथील व यानंतर सांगली येथील खासगी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. यानंतर त्यांना रविवारी घरी पाठवण्यात आले होते. मात्र, सोमवारी त्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सुनिल चावरे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गुरुवारी दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान त्यांना जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने त्यांच्यावर दोन दिवस उपचार झाले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने सांगली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या ठिकाणी पुन्हा त्यांच्या रक्ताच्या चाचण्या करून उपचार सुरु करुन त्यांना व्हेटिलेटर लावण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती उपचारास साथ देत नसल्याने त्यांना रविवारी घरी पाठवण्यात आले. मात्र, सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.