दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची खासदार व आमदार माने यांची ग्वाही

विविध सामाजिक उपक्रम अनेक भागात कार्यक्रमानिमित्त राबविले जातात. या कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या देखील सोडविल्या जातात. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे शिवसेनेतर्फे भव्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक महामेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी यांनी केले. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या उन्नतीसाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही खास. धैर्यशील माने व आम. डॉ. अशोकराव माने यांनी दिली.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन या मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.

या मेळाव्यामध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मिळावा. महामंडळाकडून कमीत कमी कागदपत्रांमध्ये व्यवसायासाठी कर्ज मिळावे. दिव्यांगासाठी नवीन घरकुल योजना राबवावी. सरसकट सर्व दिव्यांगांचे अंत्योदय रेशन कार्ड मिळावे. ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांचा ५ टक्के लाभ वेळेवर मिळावा. सरकारी कार्यालयात दिव्यांगांना योग्य वागणूक मिळावी व त्यांच्या कामाची दखल घ्यावी. सर्व सरकारी कार्यालयात दिव्यांगाचा  कोटा भरावा. दिव्यांगांच्या क्षमतेप्रमाणे एमआयडीसी व सहकारी उद्योग क्षेत्रामध्ये संधी मिळावी.

दिव्यांगांचा बचत गट स्थापन करुन बचत गटाला छोटे छोटे गृह उद्योग निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावा. अशा विविध मागण्यांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुणे येथील मधु-तारा दिव्यांग सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे यांनी बहुमोल मार्गदर्शन करुन दिव्यांगासाठी सर्व शासनाच्या योजना व त्यांच्या मागण्या अग्रक्रमाने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, दिव्यांग समितीचे अध्यक्ष संजय जाधव, मोहन मालवणकर, अविनाश बनगे, अजित सुतार, महेश माळी, प्रकाश जाधव, सतिश हुपरे, संदीप तोडकर, आनंदा मोरे, गुंडूवड्डु, राकेश कलगुटी, सुनिल बारिया, विठ्ठल रामाण्णा, विनायक तोडकर, निलेश चव्हाण, अमोल केरु, दशरथ तोडकर यांच्यासह दिव्यांग बंधू-भगिनी, उपस्थित होते.