लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र समोर आले. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. लोकसभा निवडणुकीवेळी खासदार धैर्यशील माने हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते. तर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे 10 पैकी 10 आमदार विजयी झाले. राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरी केलं आहे. या ऑपरेशन टायगरमधून ठाकरे गटासह अन्य पक्षांचे पदाधिकारी नेते, आजी खासदार-आमदारांना आपल्याकडे खेचले जात आहे. अशातच ऑपरेशन टायगरचे लोन कोल्हापूरपर्यंत पोहचे आहे. यामुळेच याचा धक्का माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संगटनेला बसला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर कोल्हापुरात सक्रिय करत पहिलाच धक्का माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कधीकाळीचे नेते आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना त्यांनी फोडले आहे.
सुजित मिणचेकर यांच्यासह हातकणंगलेचे मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांना देखील फोडून एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना धक्का दिला आहे. मुंबईत आउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिणचेकर आणि गजानन जाधव यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान मुक्तागिरी येथे या दोघांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्याआधी डॉ. सुजित मिणचेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार आहे. त्यांच्या प्रवेशाने पक्ष अधिक भक्कम होणार असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीवेळी खासदार धैर्यशील माने हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते. तर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे 10 पैकी 10 आमदार विजयी झाले. त्यानंतर असाच विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळावा यासाठी डॉ. मिणचेकर, गजानन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी नक्की प्रयत्न करतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
