रेंदाळमधील शाळांमध्ये सीसीटीव्हीची नजर, विशाल करडे यांच्या मागणीला यश 

सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या नागरिकांकडून होत राहतात. काही वेळा या मागण्या पूर्ण होतात. तर काही वेळा या मागण्या अपूर्णच राहतात. बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या उद्देशाने रेंदाळ गावातील सर्व सरकारी निमसरकारी आणि खाजगी शाळांमध्ये राज्य शासनाच्या निर्देशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, तसेच सध्या बंद असलेले कॅमेरे त्वरित कार्यान्वित करावेत, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष विशाल करडे यांनी केली होती. यासाठी ३० सप्टेंबर २०२४ रोजी रेंदाळ ग्रामपंचायतीकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले होते.

संबंधित प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही वर्षांत शाळांमध्ये विविध प्रकारच्या घटना घडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले असले, तरी अनेक शाळांमध्ये हे कॅमेरे बंद अवस्थेत होते. त्यामुळे विशाल करडे यांनी केलेल्या मागणीमुळे हा विषय पुन्हा प्रकाशझोतात आला आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली.

ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक सक्षम होणार असल्याची भावना व्यक्त केली आहे. विशाल करडे म्हणाले, आम्ही पक्षाच्या माध्यमातून नेहमीच गावच्या हिताच्या प्रश्नांवर काम करत आलो आहोत. भविष्यातही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.

रेंदाळमधील नागरिकांनी निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शाळकरी विद्यार्थी सुरक्षित राहावेत आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे मत पालक व शिक्षकांनी व्यक्त केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने भविष्यात शाळांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणखी उपक्रम राबवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रेंदाळ ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या त्वरित कार्यवाहीमुळे आता गावातील सर्व शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकवर्गाचा आत्मविश्वास वाढला असून गावकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.