आटपाडी तालुक्यातील गावागावात प्रशांत कोरटकर याच्या वक्तव्याबद्दल संताप, जोडो मारो आंदोलन

सध्या अनेक बाबतीत गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होतच आहे त्याचप्रमाणे अलीकडे अनेक अवमानकारक वक्त्यव्य देखील केले जातात. या वक्त्यव्यांचा विरोध आंदोलने अनेक भागात केली जातात. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देवून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल संतापजनक वक्त्यव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर या व्यक्तीच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तसेच सदर व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आटपाडी मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

आटपाडी नगरपंचायत समोर सदरचे जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवार, तानाजी निकम, उदय पाटील, जितेंद्र जाधव, बी.ए. पाटील, गौरीहर पवार, अजित कदम, शिवाजी पाटील, बापू कदम, अनिल सूर्यवंशी, श्रेयस पाटील, नारायण कदम, दौलत पाटील, संभाजी देशमुख उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना  फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व माँसाहेब जिजाऊ यांची बदनामी केली आहे. 

मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान आटपाडी तालुक्यातील गावागावात प्रशांत कोरटकर याच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाने त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता तालुक्यातून जोर धरू लागली आहे.