अनेक भागात सध्या विविध विकासकामे सुरु आहेत. अनेक समस्या प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. उद्या म्हणजेच १ मार्चला आष्टा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन होणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत पंचवीस लाख रूपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या अभ्यास केंद्राचे उद्घाटन शिवसेनेचे खासदार धैर्यशिल माने यांच्या हस्ते व शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक वीर कुदळे यांनी दिली.
आष्टा येथील नगरपरिषदेच्या मालकीच्या सव्हें क्रं. २६९० मधील जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र इमारतीसाठी खासदार धैर्यशिल माने यांनी पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृह, सीसीटीव्ही यंत्रणा, चौवीस तास लाईटसाठी इनव्र्व्हटरची सुविधा, प्रशस्त कंपारमेंट, पार्किंग सुविधा नामांकित वर्तमानपत्रे, आवाज प्रदूषण विरहित परिसर, ही अभ्यासिकेची वैशिष्ट्ये आहेत. या अभ्यासिकेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस सैन्य भरती तसेच अन्य अनेक शासकीय नोकरभरतीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे प्रभारी गौरव नायकवडी, भाजपा नेते मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडीक, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई तसेच जिल्हा उपप्रमुख नंदकुमार निळकंठ, तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ज्योतिलिंग चौक, मालगावे भवन जवळ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
विद्यार्थी, शिवसेनेचे पदाधिकारी व नागरीकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेवक वीर कुदळे यांनी केले आहे. यावेळी दिलीप कुरणे, माजी नगरसेवक अमोल पडळकर, शहरप्रमुख राकेश आटुगडे, अर्चना माळी, शहर संघटन नंदकुमार आटगडे, गणेश माळी उपस्थित होते.