कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याचा साखर हंगाम चार दिवसापूर्वी संपला आहे. हंगाम संपल्याने कारखान्यात मशिनची देखभालीची कामे सुरू होती. कारखान्यात वेल्डिंग, गॅस कटिंग आणि वायरिंगचे काम सुरू असताना, जमिनीवर सांडलेल्या ऑईल आणि बगॅसमुळे आग भडकली. आग लागताच मोठे स्फोटाचे आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी कारखान्याकडे धाव घेतली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आणि तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले असले तरी सुदैवाने आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
कारखान्यातील कामगारांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. पण बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले. आग भडकताच कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाला कळवण्यात आले. आग ऑईलमुळे भडकली असल्याने फोमचा फवारा मारुन आग आटोक्यात आणली आहे. आगीचे वृत्त कळताच आमदार अमल महाडिक कारखाना स्थळावर आले. त्यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब मागवले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
चिफ फायर ऑफिसर मनिष रणभिसे म्हणाले, इंजिन रुमला आग लागली असल्याने ऑईल फायर असल्याने आम्ही फोमने आग आटोक्यात आणली त्यानंतर पाणी मारुन कुलिंग सुरू केले. आग भडकल्यानंतर ऑईलचे बॅरेल फुटल्याने मोठा स्फोटाचा आवाज झाला. अग्निशमन दलाने फोम मारुन आग आटोक्यात आली. ऑईलमुळे आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले तरीही शॉर्टसर्किट झाल्याने लागले असल्याची शक्यता प्रथमदर्शनी वर्तवण्यात आली आहे.