इचलकरंजी शहरातील संजय गांधी निराधार योजना, अपंग, वृध्दापकाळ, श्रावणबाळ आदी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारा २१ हजाराचा उत्पन्नाचा दाखला गेल्या दोन महिन्यांपासून मिळत नसल्याने संबंधित लाभार्थ्यांची गैरसोय होत असून त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष्य देवून संबंधित लाभार्थ्यांना तातडीने उत्पन्न दाखले मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. इचलकरंजी शहर परिसरात संजय गांधी निराधार योजनेतील विविध लाभार्थ्यांची संख्या तब्बल ३२ हजाराहून अधिक आहे. या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानातून गोरगरीब लाभार्थी आपला उदरनिर्वाह करण्याबरोबरच औषध पाण्यासाठी पैशांचा वापर केला जातो.
या योजनेतून मिळणारे अनुदान ऑनलाईन पध्दतीने देण्याचे डिसेंबरपासून कामकाज सुरू असून लाभार्थ्यांना रांगेत उभे न राहता त्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. ज्या लाभार्थ्यांचे आधारकार्ड बँक लिंक केले नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत. या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना २१ हजार रुपये उत्पन्न असलेला उत्पन्न दाखला देणे आवश्यक असते. गेल्या काही महिन्यांपूर्वी शिरोळमध्ये दाखले देण्याच्या कारणावरून मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर उत्पन्न दाखल देण्याचे काम बंद केले आहे. तेव्हा संबंधितांना तातडीने उत्पन्न दाखल मिळण्यासाठी खासदार, आमदारांनी प्रयत्न करावे, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.
