ईश्वरपूरात चार देशी बनावटीच्या पिस्तुलासह एकास अटक, शेतात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा

चार देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीनसह २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या प्राणघातक शस्त्रसाठा ईश्वरपूर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी साहील मोहन मिसाळ (वय २६, रा.कासेगांव ता. वाळवा) याला अटक करण्यात आली. बुधवारी रात्री पेठ-नेर्ले महामार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला एकास जेरबंद करत शेतात लपवून ठेवलेला हा शस्त्र साठा पकडला.

साहील मोहन मिसाळ (वय २६, रा. कासेगांव ता. वाळवा) आणि सोहेल तांबोळी (रा. मंगळवार पेठ कराड) अशी दोघा शस्त्र तस्करी करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. यातील साहिल मिसाळ याला अटक करण्यात आली असून त्याचा कराड येथील साथीदार सोहेल तांबोळी पसार झाला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक अरुण पाटील यांनी भेट देत या कारवाईची माहिती घेतली. तसेच वरील दोघांकडे कसून चौकशीही केली. एकाचवेळी चार पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्याची कामगिरी केल्याबद्दल घुगे यांनी निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पथकातील कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.

मिसाळ हा नेर्ले बाजूच्या एका पेट्रोल पंप परिसरात संशयितरीत्या थांबला होता. पथकाने रात्र गस्तीदरम्यान त्याला हटकल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करत चौकशी केली असता त्याने तांबोळी याच्याकडून आणलेला आणि बाजूच्या शेतात लपवून ठेवलेला हा शस्त्रसाठा पोलिसांच्या हवाली केला. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही कारवाई झाली.

हवालदार अमोल सावंत यांनी दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाखाली फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदा शस्त्र बाळगणारांसह त्याची खरेदी-विक्री करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या वर्तुळात खळबळ उडाली.