कर्नाटक सीमाभागातील चित्रदुर्ग येथून २१ फेब्रुवारी रोजी प्रवासी घेऊन कोल्हापूरकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी चालकास कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी रात्री उशिरा अडविले. कन्नड भाषा येत नाही म्हटल्यावर धक्काबुक्की करत तोंडाला काळे फासले. तसेच एसटीलाही काळे फासण्यात आले होते. या घटनेचे संतप्त पडसाद दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्यात उमटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कर्नाटक सरकारविरोधात जोरदार निदर्शने करत, कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसवर भगवा झेंडा फडकवला.
त्यामुळे वातावरण अधिक चिघळू नये, तसेच एसटी बसचे नुकसान होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंकडून बस वाहतूक बंद करण्यात आली होती. प्रवासी नागरिकांसह विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. शिवाय प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. इचलकरंजी बसस्थानक येथून कर्नाटक राज्यात दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात, गेल्या आठवडयात दोन्ही बाजूंनी प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सोसावा लागला होता. इचलकरंजी बसस्थानक येथे दररोज कर्नाटक राज्यातील २० बसेस मुक्कामी येतात तर दिवसभरात सुमारे १५० हून अधिक फेऱ्या केल्या जातात.
