देशी गोवंशाचे जतन करणारे खरे गोरक्षक शेतकरीच आहेत. ‘शो ‘ ची कुत्री पाळणाऱ्या शहरातील लोकांनी आम्हा शेतकऱ्यांना गाईवर प्रेम कसे करावे, हे शिकवू नये. तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांची गाडी अडकवून त्यांची लूट करत आहेत. तुम्ही गोरक्षक नसून गोभक्षक आहेत . आता आम्हीही गावोगावी शेतकऱ्यांची ‘गोपालक सेना ‘ (Gopalak Sena) उभी करणार आहोत, अशा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी तथाकथित गोरक्षकांना दिला.
गोवंश हत्या आणि गोरक्षकाविरोधात शेतकरी, व्यापारी ,पशुपालक कृती समितीचा सांगोला येथे तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत २१ ऑगस्ट सांगोल्यात आले होते. खोत म्हणाले की ,शेतकरी देशी गाईंना कधीच बाजारात विकायला आणत नाही, मात्र ,दुधाळ जनावरे विक्रीला नेताना शेतकऱ्यांना अडवले जाते. तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांनी गाडी अडवून त्यांची लूट करीत आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या गाई- म्हशींचा बाजार मोठ्या प्रमाणात पडला आहे. पण, शेतकऱ्यांच्या जनावरांचे बाजार बंद करण्याचा डाव आम्ही चालू देणार नाही. कायदा हातात घेणाऱ्या तथाकथित गोरक्षकांवर कडक कारवाई व्हावी .
पोलिसांनी कायद्याचं गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करू नयेत . गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून एचएफ आणि होमिजिनाइजड पाश्चात्य आणि संकरित बैल यांना कत्तलीची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी कारताना शेतकऱ्यांच्या जनावरांच्या विक्रीत कोणीही अडथळा आणल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल . गोरक्षण छावण्यातील जनावरांची आकडेवारी जाहीर करून त्या ठिकाणी होणाऱ्या गैरव्यवहारांवर कारवाई करण्यात यावी. जनावरांची कायदेशीर खरेदी -विक्री अन वाहतूक पूर्वरत सुरु ठेवण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी केली.
