विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्वच भाविकांना लवकरच झटपट दर्शन मिळणार आहे. त्यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर केलेली टोकन दर्शन व्यवस्थेची सुरुवात आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मंदिर समितीची यासंदर्भातली बैठक झाल्यानंतर औसेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानुसार या व्यवस्थेचे सॉफ्टवेअर बनविण्यात आले आहे. सोमवारी सॉफ्टवेअरबाबत मंदिर समिती सदस्य अधिकारी आणि टीसीएसच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत आषाढी
एकादशी पूर्वी संपूर्ण टोकन दर्शन व्यवस्था पूर्ण होणार असून आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते याचा शुभारंभ केला जाईल, असे ठरले. देशातील जवळपास नऊ मोठ्या देवस्थानात टीसीएस कंपनीकडून या दर्शन व्यवस्थेचे सॉफ्टवेअर देण्यात आले असून या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून अतिशय सुरळीतपणे टोकन दर्शन व्यवस्था राबविण्यात येत आहे. हे टोकन दर्शन व्यवस्था सॉफ्टवेअर बनविताना पंढरपुरातील मोठ्या यात्रा सणांचे दिवस आणि इतर महत्त्वाच्या गर्दीच्या दिवसांचा विचार या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठीचे टोकन घ्यावे लागणार असून यावेळेस त्यांना दर्शनाची तारीख आणि वेळ हे टोकन वरुन दिले जाणार आहे. याचवेळेत येऊन या भाविकांना देवाचे दर्शन केवळ दीड ते दोन तासात घेता येणार आहे.
सध्या टोकन दर्शन व्यवस्था सुरू केली तरी काही दिवस भाविकांना माहिती होण्यासाठी मुख्य दर्शन रांग देखील सुरू ठेवली जाणार आहे. याशिवाय देशभरातील भाविकांना ऑनलाईन बुकिंग करूनही देण्यात येणाऱ्या दर्शनाची रांग सुरूच राहणार आहे. आता टोकन दर्शन रांग, ऑनलाईन दर्शन रांग आणि मुख्य दर्शन रांग या तिन्हीचे एकत्रीकरण कशा रीतीने करायचे याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलिस अधिक्षक यांच्यासोबत टीसीएसच्या अधिकाऱ्यांची एक बैठक येत्या १५ दिवसांत होऊन त्यानुसार अंतिम आराखडा तयार होईल, अशी माहिती औसेकर यांनी दिली.