इचलकरंजी अनेक ठिकाणी सोलर स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत 

इचलकरंजी शहर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शहरवासियांना नागरी सोयी-सुविधा पुरविताना महानगरपालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी मुख्य रस्त्यासह विविध चौक, लहान-मोठ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहे. तब्बल दहा कोटी रूपये खर्च करून शहरातील विविध प्रमुख चौकासह, मुख्य रस्ते, मैदान, बगीचामध्ये सोलरवरील स्ट्रीट लाईट लावण्यात आल्या आहेत. परंतू काही महिन्यानंतर बरेच स्ट्रीट लाईट बंद पडले आहेत. तर काही स्ट्रीट लाईट लावण्यासाठी केलेला कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेला असल्याची चर्चा सुरू असून संबंधीत मक्तेदाराकडून सदरचा खर्च वसूल करावा अशीही मागणी होऊ लागली आहे. 

वीज बिलापोटी महानगरपालिकेला दर महिन्याला लाखो रूपये घ्यावे लागत आहे. परंतू सदर देखभालीकडे मक्तेदाराचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसनू येते. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून सोलर स्ट्रीट लाईट कायमस्वरूपी लागण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षीततेसाठी चौकात तसेच मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात आले होते. अशा बऱ्याच ठिकाणी सोलरवरील स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहे. त्यानंतर काही चौकातील तसेच रस्त्यावर स्ट्रीट लाईट बंद करण्यात आली. मात्र, सध्या वीजेवरची ही स्ट्रीट लाईट आणि सोलरचेही स्ट्रीट लाईट बंद पडले आहे. त्यामुळे तेलही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था नागरिकांची झाली आहे.