सांगोला तालुक्यातील बलवडीत युवकास दांडक्याने मारहाण

सांगोला तालुक्यातील बलवडी येथे एका विधवा महिलेस भेटण्यासाठी आलेल्या युवकास तू सारखा घरी का येतो असे म्हणत, लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले. शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोमनाथ हणमंत यादव यांने सांगोला पोलीसात भारत शिवाजी भुशारी व समाधान बाबुराव भुशारी याच्याविरोधात फिर्याद दिली. सोमनाथ नाझरा येथील सोनार दुकानात काम करतो. बलवडी येथील एका विधवा महिलेशी गेल्या चार वर्षांपासून त्याचे प्रेमसंबंध आहेत.

त्यामुळे महिलेस भेटण्यासाठी तिच्या घरी मौजे बलवडी येथे गेला होता. त्यावेळी तिच्या घरासमोर भारत भुशारी व समाधान भुशारी यांनी, तू येथे सारखा घरी का येतोस असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. भारत भुशारी यांने तेथेच पडलेल्या लाकडाच्या दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारहाण करुन जखमी केले. तेव्हा भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या महिलेसही भारत यांने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.